Join us  

ओखी चक्री वादळ : रायगडातील 242 बोटी किनाऱ्यावर परतल्या सुरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 1:26 PM

रायगड जिल्ह्यातील रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे.

जयंत धुळप/ रायगड -  रायगड जिल्ह्यातील रविवारी समुद्रात असलेल्या 29 बोटींपैकी 21 बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. उर्वरीत 8 बोटी दुपारच्या सुमारास परत येतील, अशी माहिती समोर आली आहे. एकूण 250 बोटीपैकी सोमवारी सकाळपर्यंत 242 बोटी किनाऱ्यावर सुरक्षित परत आल्या आहेत. ओखी चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आता दूर झाली आहे. 

जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून समुद्र शांत आहे. प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स अक्टिव्हिटी बंद करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. सागर किनारी  सागरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या तरी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

मच्छीमारांना दोन दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहनअरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता कमी होत आहे. मात्र असे असले, तरी ते मुंबईपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असून, समुद्र खवळलेलाच राहणार आहे. परिणामी, सुरक्षेची खबरदारी म्हणून 4 आणि 5 डिसेंबरला मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबईला ‘ओखी’चा धोका लक्षात घेत, गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओखी’ चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1 हजार किलोमीटरवर आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होईल. मात्र, ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून गोव्यासह महाराष्ट्राच्या किना-यावरील समुद्र खवळलेला असेल. परिणामी, 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. लहान बोटींनीसुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह सागरी किना-यावर 4 डिसेंबर रोजी अंशत: आणि 5 डिसेंबर रोजी पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 डिसेंबर रोजी मुंबई, कोकणात सागरी भागात वा-याची तीव्रता अधिक असेल. या कारणात्सव नागरिकांनी सतर्क राहावे, अशी माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली. चक्रीवादळामुळे हवामानात बदल होत असून, किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबईरायगड