Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात होणार २४ राजीव गांधी भवन

By admin | Updated: November 18, 2014 23:07 IST

ठाण्यासह, नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात आता पूर्वीच्या गाव सभा, ग्रामपंचायतीच्या महासभा या चावडीवर भरविल्या जात होत्या

अजित मांडके, ठाणेठाण्यासह, नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात आता पूर्वीच्या गाव सभा, ग्रामपंचायतीच्या महासभा या चावडीवर भरविल्या जात होत्या. परंतु आता याच चावडीचा कारभार बंदीस्त आणि सुसज्ज अशा इमारतीत होणार आहे. त्यासाठी आता ठाणे व नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात २४ ठिकाणी राजीव गांधी भवन उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत समितींच्या ग्रामसभा, गावाची व खेड्या -पाड्यांची सभा पूर्वी मैदानात अथवा मंदिराच्या पटांगणात होत होत्या. काही ठिकाणी तर या सभा झाडाखाली होत आहेत. यावर उपाय म्हणून आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजासाठी तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम व महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासह सभा होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राजीव गांधी भवन उभारण्यात येत आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ ठिकाणी भवन उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातील २ कामे पूर्ण झाली असून उर्वरित ठिकाणी शौचालय, फरशी बसविणे, प्लॅस्टर करणे आदी कामे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरण जोडणी व नळ जोडणीचे काम शिल्लक असल्यामुळे कामे अपूर्ण असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. येत्या काही महिन्यात ही कामे पूर्ण होऊन चावडीच्या बैठकी याठिकाणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.