डोंबिवली : शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन एमआयडीसी भागातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला होता. याचा मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागलाच त्याचबरोबर परिसरातील कंपन्यांचेही कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच त्यात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगून महावितरणने केडीएमसीवर खापर फोडले आहे. शनिवारी दुपारी ३ ला खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास २४ तासांचा कालावधी लागला. ग्रामीण भागांसह कल्याण-डोंबिवली शहरांतही विजेचा लपंडाव सुरू होता. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. काही ठिकाणी रविवारीही विजेची ये-जा सुरू होती. यावर आता वीजपुरवठा सुरळीत असल्याचा दावा महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
एमआयडीसीत २४ तास वीज खंडित
By admin | Updated: March 1, 2015 22:57 IST