Join us

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच दिली बी. एड्.ची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:06 IST

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच दिली बी. एड्.ची परीक्षाजिद्द, चिकाटीच्या जाेरावर ३० वर्षीय महिलेने अवघड परिस्थितीवर ...

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच दिली बी. एड्.ची परीक्षा

जिद्द, चिकाटीच्या जाेरावर ३० वर्षीय महिलेने अवघड परिस्थितीवर केली मात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जिद्द आणि चिकाटी असेल तर कठिणातले कठीण ध्येय साध्य करता येते, हे मुंबईकर ३० वर्षीय महिलेने दाखवून दिले आहे. तिने उच्च रक्तदाब आणि कावीळवर मात करत जुळ्या मुलांना जन्म दिला. इतकेच नव्हे तर मुलांना जन्म दिल्यानंतर २४ तासांनी बेडवरूनच बी. एड्.ची परीक्षा दिली. दिव्‍या शर्मा असे या महिलेचे नाव आहे.

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टन्ट-ऑब्स्‍टेट्रिशियन व ग्‍यानेकोलॉजिस्‍ट डॉ. अतुल गणत्रा यांनी सांगितले की, ही महिला ३६.६ आठवड्यांची गरोदर होती आणि तिच्‍या गर्भामध्‍ये जुळी मुले होती. तिला रुग्णालयामध्‍ये दाखल करण्यात आले, तेव्‍हा उच्‍च रक्‍तदाब हाेता आणि तिच्‍या रक्‍तामधील प्‍लेटलेट्स खूपच कमी झाल्‍या होत्‍या. तिला कोलेस्‍टेसिस असल्‍याचे निदान झाले. आम्‍ही त्‍वरित तिला स्थिर केले आणि शस्त्रक्रियेसाठी नेले. तिच्‍या स्थितीमुळे सी-सेक्‍शन अत्‍यंत धोकादायक बनले. आमच्‍या टीमची अचुकता व वैद्यकीय कौशल्‍याच्‍या मदतीने आम्‍ही तिची प्रसुती करण्‍यात यशस्‍वी झालो. तिने एक मुलगा व मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्‍म दिला.

शस्‍त्रक्रियेच्‍या काही तासांनंतर आम्‍हाला समजले की, तिची बी. एड्.ची अंतिम परीक्षा आहे आणि तिची परीक्षा देण्‍याची इच्‍छा आहे. तिची स्थिती पाहता आम्‍हाला वाटले की, तिला परीक्षा देणे अवघड जाईल. पण तिने आम्‍हाला मदत करण्‍याची विनवणी केली. आम्‍ही तिचा निर्धार खचू दिला नाही आणि आयसीयू बेडवरून तिला परीक्षा देता येईल, अशी व्‍यवस्था करण्‍याचे ठरवले. दरम्यान, उपचारांमुळे तिच्या स्थितीमध्‍ये सुधारणा झाली आणि आम्‍ही तिला वॉर्डमध्‍ये हलवले, जेथे ती सुलभपणे परीक्षा देऊ शकली.

* डाॅक्टर्स, परिचारिकांसह महाविद्यालयाचेही आभार

माझ्या पत्नीने उच्च रक्तदाब आणि कावीळवर मात करत जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर बी. एड्.ची परीक्षा दिली. परीक्षा देण्‍याची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी तिला मदत करणाऱ्या डॉक्‍टर्स व परिचारिकांचे तसेच तिच्‍या महाविद्यालयाचेही आभार मानतो, ज्‍यांनी हॉस्पिटलमधून ऑनलाईन परीक्षा देण्‍यास परवानगी दिली.

- मनिष शर्मा, महिलेचे पती

---------------------------------------