Join us

काेराेनामुळे दुकानदारांना २३ हजार ४५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

२१ दिवसांतील आकडेवारी; फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर ...

२१ दिवसांतील आकडेवारी; फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे राज्यात गेल्या २१ दिवसांत दुकानदारांना २३,४५० कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दिली.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले की, राज्यात एकूण १३ लाख दुकानदार आहेत. सरासरी एका दुकानाला प्रतिदिन १०००० दहा हजारांहून अधिकचे नुकसान हाेत आहे. त्यापूर्वी राज्यात काही ठिकाणी वीकेंड आणि काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन होते. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद आहेत; पण वीज बिल, कामगारांचे पगार हा खर्च आहे. त्यामुळे दुकानदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत. सरकारने परवाना शुल्क माफ करावे, मालमत्ता कर माफ करावा, कर्मचाऱ्यांसाठी भत्ता जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

* असे झाले नुकसान

राज्यात एकूण १३ लाख दुकानदार आहेत. त्यांना सरासरी एका दुकानाला प्रतिदिन १०००० दहा हजारांचे नुकसान आहे. सर्व दुकानांचे प्रतिदिन १३०० कोटी याप्रमाणे पूर्ण लॉकडाऊनच्या १५ दिवसांत १८२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर त्यापूर्वी राज्यात काही ठिकाणी वीकेंड आणि काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन होते. त्यावेळी प्रतिदिनी ७५० कोटी याप्रमाणे दिवसाला ५२५० रुपयांचे नुकसान झाले. अशा प्रकारे गेल्या २१ दिवसांत दुकानदारांना २३,४५० काेटींचे नुकसान झाले.

.............................