Join us  

मुंबई शहर व उपनगरातून २३४ पशू-पक्ष्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:12 AM

पशू, पक्ष्यांसंदर्भात मालाड कॉर्पोरेट आॅफिस आणि एसएनडीटी कॉलेज (माटुंगा) येथे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले होते.

मुंबई : शहर व उपनगरामध्ये पशू, पक्षी मनुष्यवस्तीत आढळल्याच्या घटना वारंवार घडत असतात. या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता होत आहे. मनुष्यवस्तीत मोठ्या प्रमाणात साप शिरल्याच्या घटना ऐकीवात येतात. अशावेळी जवळपासच्या सर्पमित्रांना किंवा प्राणिसंस्थेला संपर्क करून त्या सापांची माहिती दिली जाते आणि सुटका केली जाते. अशाच प्रकारे नोव्हेंबर महिन्यात ‘सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाइल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) संस्थेने २३४ पशू, पक्ष्यांची सुटका केली. याबाबतचा अहवाल नुकताच या संस्थेने सादर केला आहे.‘सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाइल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे म्हणाले, नोव्हेंबर महिन्यात संस्थेने २२४ साप, सहा सस्तन प्राणी व चार पक्षी अशा एकूण २३४ पशू-पक्ष्यांची सुटका केली. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक साप कांदिवली येथून ४२, बोरीवलीतून ३५ आणि मालाडमधून २५ सर्प ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काही विषारी सापसुद्धा आढळून आले होते. विषारी सापांत १५ घोणस, ६२ नाग आणि २ मण्यार यांचा समावेश होता. याशिवाय एक घोरपड, एक माकड, दोन खारी, एक बकरी आणि एक मुंगुस या प्राण्यांनादेखील ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन घुबड, एक पांढरा रम्पेड स्विफ्ट पक्षी आणि एक घार या पक्ष्यांचीदेखील सुटका करण्यात आली. पशू, पक्ष्यांसंदर्भात मालाड कॉर्पोरेट आॅफिस आणि एसएनडीटी कॉलेज (माटुंगा) येथे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले होते.सापाशी निगडित अनेक अंधश्रद्धा आहेत. पण एखाद्याला सर्पदंश झाला असेल तर बुवाबाजी करण्यापेक्षा थेट रुग्णालयात रुग्णाला दाखल करा, असेही शिंदे यांनी सांगितले.सापांची हकालपट्टी अयोग्य- साप हा पर्यावरणातील एक अविभाज्य घटक आहे. देशभरात सापांच्या ३०० हून अधिक प्रजाती आढळतात. सापांचे अधिराज्य हे फक्त जंगलात नसून शेतात व मानवी वस्तीजवळील विहिरी, नाल्यांमध्ये असते. अशावेळी या अधिवासातून सापांची हकालपट्टी करणे योग्य नाही. त्यांच्यासोबत सहजीवन कसे करता येईल, यावर विचार केला पाहिजे.

टॅग्स :मुंबई