अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीठाणे आरटीओच्या हद्दीत दोन वर्षापूर्वी जप्त केलेल्या खासगी बसला मंगळवारी दुपारी आग लागली. ती नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण समजू शकलेले नसले तरीही अशा जप्त केलेल्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र या घटनेमुळे ऐरणीवर आल्याची सर्वत्र चर्चा आहे. कल्याण आरटीओत देखील गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे २२० वाहने विविध गुन्ह्यांखाली जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी अवघे एक-दोन कर्मचारी तैनात असल्याचे वास्तव समोर आले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार तेथील वाहनांना कोणताही धोका नसला तरीही त्याबाबतची शाश्वती मात्र त्यांनी दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून १५० ते २०० रिक्षा, चार-सहा ट्रक, चार बस आदी वाहने त्या ठिकाणी आहेत. त्या वाहनांचा रोजच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, अशी त्याची रचना असल्याचेही निदर्शनास आले. या गाड्यांमध्ये रिक्षांचे प्रमाण अधिक आहे. काही केसेस मध्ये आर्थिक व्यवहारातील त्रुटी, परमीट चा मुद्दा, कर न भरणे, यासह सोळा वर्षांवरील गाड्या, बेकायदेशीर गाड्या अशा नानाविध गुन्ह्यांखाली ही वाहने जप्त करण्यात आली आहे.साधारणत: चार महिन्यांपर्यंत या वाहनांच्या संबंधितांशी पत्र व्यवहार, चार-पाच वेळा नोटीस काढली जाते, विशीष्ट कालावधीनंतर प्रसिद्धी माध्यमातून जाहिर नोटीस काढली जाते, त्यानंतर मात्र जप्तीच्या संबंधित गाडीचे काय करायचे, लिलाव करायचा कि अन्य निर्णय घ्यायचे हे संबंधित आरटीओ अधिकारी ठरवतात. अनेकदा संबंधित वाहनचालक-मालक हे कर चुकवण्यासाठी, गाडी जुनी झाली असल्यास वाहन जप्त झाले तरीही त्याबाबातची काळजी घेत नाहीत़ नोटीसीलाही अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत, अनेकदा बँकेसह पतपेढ्या आदी तांत्रिक कारणांमुळेही कार्यवाही करण्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.
सहा महिन्यांत २२० वाहने जप्त!
By admin | Updated: February 4, 2015 22:54 IST