लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. शुक्रवारपासून लोकलच्या २०४ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
उपनगरीय मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली जात आहे. सध्या या मार्गावर २ हजार ७८१ लोकल फेऱ्या राेज हाेतात. येत्या शुक्रवारपासून २०४ फेऱ्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे राेज २,९८५ लोकल फेऱ्या हाेतील. यात मध्य रेल्वे मार्गावर १,६८५ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १,३०० फेऱ्या हाेतील.
सोमवार, २५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगरीय लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या वेळी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशा प्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
* सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा
शुुक्रवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू हाेईल. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. मात्र यातून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा नाही. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच वाढलेल्या लोकल फेऱ्यांमधून प्रवास करण्याची परवानगी आहे.
................