मुंबई : स्थानिक पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांनी चलन बदलाच्या घोषणेनंतर तारांकित हॉटेलचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, अवघ्या एका दिवसात एक ताऱ्यापासून पंचतारांकित हॉटेल उद्योगाला सुमारे २०० कोटींहून अधिक नुकसान सहन करावे लागले आहे. हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.दातवानी म्हणाले की, चलन बदलामुळे पर्यटकांची क्रयशक्तीच संपली आहे. परिणामी, भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांनी बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच स्थानिक पर्यटकांनीही येथील बुकिंग रद्द करत, पर्यटनासाठी आपला मोर्चा परदेशाकडे वळवला आहे. हॉटेलमध्ये असलेल्या पर्यटकांना थांबवणेही हॉटेल चालक आणि व्यवसायिकांना कठीण झाले आहे. परिणामी, काही हॉटेल चालक नुकसान कमी करण्यासाठी चलन बदलाच्या निर्णयाविरोधात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याची माहिती संघटनेला मिळाली आहे.पर्यटकांशिवाय हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू खरेदी करणेही हॉटेल चालकांना जड जात आहे. भाजीपाला, फळे, मांस आणि अन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांपासून वाहतूकदारांपर्यंत बहुतेक घटकांसोबतचे व्यवहार हे रोखीचे असतात. मात्र, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास संबंधित घटकांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे काही हॉटेलने मेनू कार्डमधील काही पदार्थ ठरावीक दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. एकंदरीत चलन बदलाचा विपरित परिणाम हॉटेल उद्योगाच्या सेवेवर होत आहे. त्यामुळे चलन वापराची प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल. मात्र, त्याचा परिणाम हॉटेल उद्योगाला आणखी काही काळ सहन करावा लागेल, असेही दातवानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हॉटेल उद्योगाचे २०० कोटींचे नुकसान
By admin | Updated: November 10, 2016 06:28 IST