मुंबई : मरोशी ते रुपारेल बोगदा प्रकल्पांतर्गत होणार्या दुरुस्तीच्या कामामुळे काही विभागांत २ व ३ जून रोजी होणार्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात होणार आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून आदल्या दिवशीच पुरेसा पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. पालिकेतर्फे मरोशी ते रुपारेल बोगदा प्रकल्पांतर्गत जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. शिवाय इतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी पवई ते सहार दरम्यान ९६ इंच व्यासाची वैतरणा जलवाहिनीवर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी शहरातील ए, सी, डी, जी/उत्तर, जी/दक्षिण तसेच बी व ई विभागातील काही परिसरात होणार्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात ठेवण्यात आली आहे. तर पश्चिम उपनगरातील एच/पूर्व व के/पूर्व विभागास होणार्या पाणीपुरवठ्यात २०% कपात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सोमवार-मंगळवारी २० टक्के पाणीकपात
By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST