Join us  

पुनर्वापरासाठी मलजल केंद्राद्वारे रोज मिळणार २ हजार दशलक्ष लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:04 AM

महापालिका क्षेत्रातील मलजलावर प्रक्रिया करून त्याद्वारे पिण्याव्यतिरिक्तच्या इतर बाबींसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ८ मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मुंबई : महापालिका क्षेत्रातील मलजलावर प्रक्रिया करून त्याद्वारे पिण्याव्यतिरिक्तच्या इतर बाबींसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ८ मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या मलजल केंद्राद्वारे दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे.महापालिका क्षेत्रात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे, नौसेना, बीपीसीएल, एचपीसीएल, विमानतळ प्राधिकरण, गोदी इत्यादी आस्थापना महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पाणी खरेदी करतात. महापालिकेद्वारे या आस्थापनांना पुरविले जाणारे पाणी हे पिण्याचे पाणी असते. याच पाण्याचा रेल्वेचे डबे धुण्यासारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठीही वापर होतो. यासारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी मलजल प्रक्रिया केंद्रामधून उपलब्ध होणाऱ्या पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर व्हावा, यासाठी आतापासूनच आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी. जेणेकरून भविष्यात पुनर्प्रक्रिया केलेल्या या पाण्याचा सुयोग्य वापर होऊन पिण्याच्या पाण्याचा संभाव्य अपव्यय टाळला जाईल. सोबतच अधिक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.