Join us  

पश्चिम उपनगरातील स्कायवॉकच्या दुरुस्ती खर्चात २.४९ कोटींची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 7:44 PM

गोरेगाव ते कांदिवली या पश्चिम उपनगरातील पट्ट्यात असलेल्या आकाशमार्गिकेची (स्कायवॉक) महापालिकेमार्फत दुरुस्ती केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - गोरेगाव ते कांदिवली या पश्चिम उपनगरातील पट्ट्यात असलेल्या आकाशमार्गिकेची (स्कायवॉक) महापालिकेमार्फत दुरुस्ती केली जात आहे. मात्र मधल्या काळात या दुरुस्तीच्या खर्चात  दोन कोटी ४९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र स्कायवॉकचा वापराबाबत सदस्यांनी शंका उपस्थित केल्या. 

गोरेगाव पश्चिम, कांदिवली पूर्व, बोरिवली पश्चिम, दहिसर पूर्व - पश्चिम या ठिकाणी असलेल्या स्कायवॉकच्या दुरुस्तीचा निर्णय पालिकेने घेतला होता. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून १३ कोटी ६२ लाख १७ हजार रुपयांचे कंत्राट एम.इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम १७ मार्च २०१९ पासून ठेकेदाराने सुरु केले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा पादचारी पूल कोसळल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करण्यात आले. याच काळात दहिसर येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळण्याची घटना घडली.

त्यानंतर सर्व स्कायवॉकच्या ऑडिटची जबाबदारी व्हीजेटीआय या संस्थेवर सोपविण्यात आली. या संस्थेने सादर केलेला अहवाल तसेच अंदाजपत्रकानुसार सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला. तर स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने सुधारित अंदाजपत्रकानुसार दुरुस्तीची कामे करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे स्कायवॉकच्या कामांमध्ये वाढ झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये चर्चेसाठी आला असता, स्कायवॉकचा फारसा वापर होत नसल्याने हा खर्च अनाठायी असल्याची टीका सदस्यांनी केली. 

* स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी पालिकेने १८ कोटी ३१ लाख ८७ हजार रुपये अंदाजित खर्च निश्चित केला होता. त्यात तीन कोटी ९० लाख रुपयांची वाढ झाली. त्यामुळे अंदाजित खर्च २२ कोटी २१ लाख ८७ हजार रुपयांवर पोहोचला. 

* ठेकेदाराने सादर केलेल्या निविदेनुसार १३ कोटी ६२ लाख १७ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यात आता मूळ कंत्राटात फेरफार करीत दोन कोटी ४९ लाख ४६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी ११ लाख ६४ हजार रुपये सुधारित खर्च सादर करण्यात आला. 

* स्कायवॉकचा वापर मुंबईत अनेक भागांमध्ये होताना दिसत नाही. काही ठिकाणी स्कायवॉकवर गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांच्या अड्डा असतो, अशी तक्रार काही सदस्यांनी स्थायी समितीमध्ये केली. स्कायवॉकची देखभाल नियमित केली जावे, अशी सूचना काही सदस्यांनी केली. 

टॅग्स :मुंबई