Join us  

भिवंडीतील 'त्या' वृद्धाश्रमात आणखी 17 जण पॉझिटीव्ह, एकूण आकडा 79 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 8:26 AM

दोन दिवसांपूर्वी याच वृद्धाश्रमातील तब्बल 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

भिवंडी: दोन दिवसांपूर्वीच भिवंडीतील 62 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात हा प्रकार घडला. त्यानंतर आता आज वृद्धाश्रमातील आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 79 वर पोहोचला आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात आश्रमातील काही जणांना तापेची लक्षणे जाणवू लागली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आता पॉझिटिव्ह आलेल्या 17 जणांमध्ये 4 ज्येष्ठ नागरिक असून 1 महिला आणि अन्य 12 केअरटेकर आहेत, अशी माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेंघे यांनी दिली.

गेल्या आठवड्यात काहीजण आजारी पडल्यानंतर खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्वांच्या चाचणीनंतर 62 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता यात आणखी 17 जणांची वाढ झाली आहे. सध्या या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आश्रमात सुमारे 100 हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईभिवंडी