Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना १७ तास नो-एण्ट्री

By admin | Updated: August 18, 2014 00:58 IST

शहरात दहीकाला उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, सोमवारी ठाण्याच्या टॉवर नाका व टिळक चौक, ओपन हाउस अशा विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे

ठाणे : शहरात दहीकाला उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, सोमवारी ठाण्याच्या टॉवर नाका व टिळक चौक, ओपन हाउस अशा विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी म्हणून या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सर्व वाहनांना टॉवर नाका व टिळक चौकात नो-एण्ट्री करण्यात आली आहे. गडकरी रंगायतन ते टॉवर नाका रोड आणि डॉ. मुस चौकातील दोन्ही बाजूंना सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात मुंबई-उपनगरांतून येणाऱ्या गोविंदा पथकांनी वाहने शहरात आणू नयेत, ती पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर उभी करावीत. त्याचबरोबर ठाणेकरांनीही कमीतकमी वाहने बाहेर काढण्याचे आवाहन के ले आहे.स्टेशन बाजूकडून टॉवर नाका ते टिळक चौक या रस्त्यावरील सर्व वाहतुकीस डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंदी केली आहे. ही वाहने स्टेशनकडून मुस चौक, गडकरी रंगायतन सर्कल, दगडीशाळा, अल्मेडा चौकमार्गे पुढे जाणार आहेत. सॅटीस पुलावरून स्टेशन बाजूकडून टॉवर नाक्याकडे येणाऱ्या सर्व टीएमटी व एसटी बसेसना प्रवेश बंदी केली आहे. त्या स्टेशनकडून सॅटीस पुलावरून दादा पाटीलवाडीमार्गे गावदेवी, मुस चौक, गडकरी रंगायतन चौकमार्गे पुढे जातील. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना रुग्णालय कॉर्नर येथे प्रवेश बंदी घातली आहे. कोर्टनाक्याकडून टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या वाहनांस जिल्हाधिकारी कार्यालय, आंबेडकर पुतळा येथे प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे आंबेडकर रोड येथून टिळक चौक नाक्याकडे येणारी वाहने जिल्हा रुग्णालय, जीपीओ-कोर्टनाका, जांभळी नाका येथून बाजारपेठ करीत स्टेशनला जातील. तसेच दगडीशाळा येथून सेंट जॉन स्कूलमार्गे टिळक चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक बंद केली असून, ही वाहने अल्मेडा चौक तसेच स्व. निर्मलादेवी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील. विशेष म्हणजे गडकरी रंगायतन ते टॉवर नाका रोड आणि टिळक चौक-टॉवर नाका-मुस चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. तर ओपन हाउस येथील दहीकाल्यासाठी गुरुकुल सोसायटी, कचराळी तलाव येथून ओपन हाउसकडे येणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)