Join us

अष्टमीतील १७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: April 19, 2015 01:49 IST

तालुक्यातील पालेतर्फे अष्टमी येथील भवानी मातेच्या पालखी सोहळ्यात दोन गटांत झालेल्या मारहाणीत नथुराम खांडेकर याची हत्या करण्यात आली होती.

रोहा : तालुक्यातील पालेतर्फे अष्टमी येथील भवानी मातेच्या पालखी सोहळ्यात दोन गटांत झालेल्या मारहाणीत नथुराम खांडेकर याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील १७ आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालानंतर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. सुमारे चार दशके राजकीयदृष्ट्या शेतकरी कामगार पक्षाच्या वलयाखाली असलेल्या पालेतर्फे अष्टमी गावातील काही तरुणांनी राष्ट्रवादी पक्षाची कास धरल्यानंतर गावात खऱ्या अर्थाने धुसफूस सुरू झाली होती. गावातील वातावरण कायम धुमसत राहिले होते. अनेकदा हाणामारीचे प्रसंग होत राहिले. काही दिवस गावात शांतता दिसून आली तरी दोन्ही बाजूंकडील मनात सल मात्र धुमसतच होती. त्याचे स्वरूप एवढे भयानक असेल याचा अंदाज मात्र गावातील नागरिकांनाही आला नव्हता. पालखी सोहळ्यावेळी गावात विपरीत काही घडेल म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही दोन गटांत तुंबळ हाणामारी होत नथुराम खांडेकर यांची हत्या झाली. दोघे गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच दोन्ही गटांमध्ये सामंजस्य निर्माण केले असते तर ही हत्या झाली नसती, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ग्रामस्थ राजकारण्यांच्या आहारी जात टोकाची भूमिका असल्याने त्याचे दुष्परिणाम मात्र पुढील पिढीला भोगावे लागणार आहेत.