Join us  

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी सकाळपर्यंत १६९.१८ मीमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:26 PM

ठाण्यात रात्री पासून सुरु असलेल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली, शहरातील सहा ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती.

ठाणे : मागील काही दिवस रिपरिप किंवा अधून मधून पडणाऱ्या पवासाने मंगळवारी रात्री पासून चांगलीच दमदार हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १६९ मीमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी दिवसभर कोळाख होऊन पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. या पावसामुळे शहरातील सहा ठिकाणी पाणी साचले होते, तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.                           गेल्या काही दिवसापासून सांयकाळच्या सुमारास पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस बरसणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार २२ तारखेला रात्री १०.३० च्या सुमारास शहरात पाऊस बरसण्यास सुरवात झाली. सुरवातीला हलक्या सरी बरसत होत्या. मात्र रात्री १२ नंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. रात्री ११.३० ते १२.३० या एका तासाच्या वेळेत ४५.४७ मीमी पावसाची नोंद झाली. तर १ ते २.३० वाजेपर्यंत पुन्हा ४१.१५ मीमी पाऊस शहरात पडला. त्यानंतर ३.३० नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. पहाटे ५.३० ते ६.३० या कालावधीत ५.५९ मीमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८.३० पर्यंत १६९.१८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत शहरात ३५५६.३१ मीमी पाऊस झाला असून मागील वर्षी याच कालावधीत ४३१९.९१ मीमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत ७६३.६ मीमी कमी पावसाची नोंद झाली आहे. तर रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे कळवा स्टेशन जवळील सत्यम शिवम सुदंरम इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. तर,चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, पाणी वाहुन जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या गटारांची पुर्ती दैना उडाल्याचे दिसून आले. तर पावसाळ्या आधी अगोदर व पावसाळ्यात नेमके काय नियोजन केले होते, त्याचा प्रत्यय देखील येथील रहिवाशांना रात्री ३ च्या सुमारास आला. तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. तर बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. सांयकाळी ४ वाजता हायडाईड असल्याने खाडीत ४.०८ मीटरच्या उंच लाटा उसळणार होत्या. परंतु पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने संभाव्य धोका टळला. परंतु या निमित्ताने सर्वांना सर्तकतेच्या सुचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकापाऊस