Join us

७५ एमएलडी योजनेस १६७ कोटी

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडून मंजूर अतिरिक्त ७५ एमएलडी (मिलियन लीटर्स पर डे) शहरात आणण्यासाठी राज्य शासनाने एकूण

राजू काळे, भार्इंदरएमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडून मंजूर अतिरिक्त ७५ एमएलडी (मिलियन लीटर्स पर डे) शहरात आणण्यासाठी राज्य शासनाने एकूण २३९ कोटी ६२ लाख रु. योजनेपैकी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १६७ कोटी ४४ लाख रु.चे अनुदान मंजूर केले आहे. उर्वरित ७१ कोटी ७६ लाख रु. पालिकेला खर्च करायचे आहेत. माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या पाठपुराव्यामुळे २०१२ मध्ये आयोजिलेल्या बैठकीत एमआयडीसीच्या कोट्यातून मीरा-भार्इंदर शहराला १०० एमएलडी पाणी मंजूर केले होते. त्यातील ३० एमएलडी पाणी शहराला देण्यात आल्यानंतर उर्वरित ७० एमएलडी पाण्यापैकी २० एमएलडी पाणी काही महिन्यांपूर्वीच शहरात येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शहराला एमआयडीसीकडून ५० व स्टेमकडून ८६ असे एकूण १३६ एमएलडी पाणी दररोज मिळत आहे. मंजूर १०० एमएलडीमधील उर्वरित ५० एमएलडी पाण्यासह अतिरिक्त २५ एमएलडी असे एकूण ७५ एमएलडी पाणी शहराला एमआयडीसीकडून प्राप्त होणार आहे. हे पाणी शहरात आणण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २६९ कोटी ६२ लाख खर्चाचा प्रकल्प अहवाल नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय समितीकडे सादर केला होता. या प्रकल्पाला आयआयटीने डिसेंबर २०१४ मध्ये मंजुरी दिल्यानंतर ३ मार्च २०१५ रोजी राज्यस्तरीय समितीनेदेखील त्यावर शिक्कामोर्तब केले. मूळ प्रकल्प किमतीत कपात करीत राज्य शासनाने या २३९ कोटी ६२ लाखांच्या योजनेला मंजुरी देत योजना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १३७ कोटी ४४ लाखांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. यामुळे शहराला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यासाठी सुमारे ३ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत शीळफाटा येथून पातलीपाडा दरम्यान १,५९० मिमी व्यासाची तर पातलीपाडा ते मीरा रोड येथील हाटकेशदरम्यान १,३९० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी शहरात आणण्यासाठी साकेत येथे बुस्टर पम्पिंग स्टेशन निर्माण केले जाणार आहे.