मुंबई : मुंबईतील खड्डे, रस्ते दुरुस्ती व चर हे ठेकेदारांसाठी ‘चरण्याचे’ कुरण ठरत आहेत़ रस्त्यांचा ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतरही पालिकेची तिजोरी लुटून आपल्या तुंबड्या ठेकेदार भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे़ नागरी सुविधांसाठी केलेले खोदकाम बुजविणाऱ्या ठेकेदारांनी एका वर्षात ३५० कोटी रुपये उडवले आहेत़ तरीही १५९ कोटी रुपयांचा वाढीव निधी या ठेकेदारांना मंजूर करण्यात आला आहे़ठेकेदारांना दोन वर्षांत ३५० कोटी खर्च करायचे होते़ कालांतराने पालिकेने दोन वर्षांच्या कंत्राटाची मर्यादा एका वर्षावर आणली़ त्यामुळे या ठेकेदारांची मुदत ३१ मे रोजी संपली़ या ठेकेदारांनाच पुन्हा मुदतवाढ देण्याचा पर्याय पालिकेपुढे होता़ तोपर्यंत या ठेकेदारांनी दोन वर्षांचा निधी एकाच वर्षात संपविल्याचे उजेडात आले़ रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राट दिल्याप्रकरणी न्यायालयाने नुकतेच महापालिकेला फटकारले़ डोळे झाकून प्रस्ताव मंजूर करणाऱ्या स्थायी समितीलाही झापण्यात आले़ मात्र त्याच दिवशी स्थायी समितीत १५९ कोटींच्या वाढीव निधीची खिरापत ठेकेदारांना करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)मुंबईत दररोज चारशे कि़मी़ रस्त्यांचे खोदकाम केले जाते़ चर बुजविण्यासाठी ३५० कोटी दोन वर्षांत खर्च करण्यात येणार होते़ मात्र आता चर बुजविण्यासाठी दोन वर्षांतच तब्बल एकूण ४५९ कोटी खर्च होणार आहेत़
‘चर’ण्यासाठी १५९ कोटींचे कुरण
By admin | Updated: July 7, 2016 00:51 IST