मुंबई : महापालिकेच्या दक्षता पथकाने सांताक्रुझ येथे केलेल्या एका कारवाईत ३ लाख ५२ हजार ५७८ रुपये किमतीचे अत्यंत घातक ज्वालाग्राही असणारे १५८ एल.पी.जी. सिलिंडर्स जप्त केले आहेत. शिवाय या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, रामकरण बिष्णोई याला अटक करण्यात आली आहे.महापालिकेकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अनुज्ञापन अधीक्षक यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या दक्षता विभागाने (अनुज्ञापन) रामकरण बिष्णोई यांच्या सांताक्रुझ पश्चिम येथील जुहू गॅस एजन्सीच्या जागेवर धाड टाकली. यात ३ लाख ५२ हजार ५७८ रुपये किमतीचे अत्यंत घातक ज्वालाग्राही असणारे १५८ एल.पी.जी. सिलिंडर्स अधिनियम कलम ३९४ अन्वये मिळणाऱ्या अनुज्ञापत्राशिवाय ठेवल्याने जप्त करण्यात आले. या जागेत अनधिकृतपणे गॅस सिलिंडर्स ठेवल्याच्या आरोपावरून सांताक्रुझ पोलीस ठाण्याने दखलपात्र गुन्हा नोंदवून सिलिंडर्स जप्त केले. शिवाय गॅस एजन्सीचे व्यवस्थापक बिष्णोई याला अटक केली. जप्त करण्यात आलेले सिलिंडर्स महानगरपालिकेच्या देवनार येथील अग्निरोधक गोदामात ठेवण्यात आले आहेत.उप आयुक्त राजेंद्र वळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुज्ञापन अधीक्षक एस. बी. बांडे (प्रभारी) व उप अनुज्ञापन अधीक्षक डी. एल. हेगडे व एस. आर. शेख यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) अनिल काटे व निरीक्षक (अनुज्ञापन) डी. एस. भंडारे, एस. के. बेरगळ, एस. एस. राणे, के. डी. हर्डीकर व एस. एल. गोसावी व पोलीस उप निरीक्षक ओलेकर आदींनी या कारवाईसाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
१५८ सिलिंडर्स जप्त
By admin | Updated: January 17, 2015 01:39 IST