- अतुल कुलकर्णी, मुंबई मुंबई पोलिसांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठिंबा आणि पोलिस दलाची इच्छाशक्ती यातून मुंबईतल्या वेगवेगळ्या धर्माच्या १५०० वास्तूंवरचे भोंगे उतरवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे मुंबईसारखे महानगर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांपासून मुक्त होण्याची ही पहिली वेळ आहे.
मंदिर, मज्जिद, गुरुद्वारा, चर्च या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून देशभर सातत्याने वाद होत असताना मुंबईत ही अनोखी घटना घडली आहे. आता मुंबईतल्या कुठल्याही धार्मिक स्थळावर एकही भोंगा उरलेला नाही. ही मोहीम प्रत्यक्षात उतरवण्याचे काम पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी केले.
कुठलाही गाजावाजा न करता पडद्याआड दोन महिने ही मोहीम सुरू होती. याचा दर आठवड्याला मुख्यमंत्री फडणवीस स्वतः आढावा घेत होते. जिथे कोणी अडथळे निर्माण करत होते त्या ठिकाणीही ते स्वतः बोलत होते.
या विषयाला राजकीय रंग येऊ न देता सामोपचाराने हा विषय मार्गी लागण्यासाठीचे तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे देवेन भारती म्हणाले, मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. कुठेही, कसलाही विरोध न होता सर्व धार्मिक स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यास सगळ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे आज मुंबईचा हा पॅटर्न महाराष्ट्र पॅटर्न म्हणून देशभर ओळखला जाईल.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील धार्मिक स्थळावर भोंगे लावण्यावरून आंदोलनाची भूमिका घेतली होती. भाजपचेही काही नेते यावरून राजकारण करत होते. आता भोंगेच उरले नाहीत त्यामुळे राजकारणही उरणार नाही, अशी भावना एका भाजप नेत्याने बोलून दाखवली आहे.
सर्वधर्मियांनी दाखविलेला सलोखा हेच मुंबईचे खरेखुरे स्पिरीट
भोंगे उतरविण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका आम्ही घेत होतो. सर्वधर्मीय नेते, धर्मगुरु यांच्याशीही आपण स्वतः बोललो व गरजेनुसार त्यांच्याही बैठका घेतल्या. आमच्या वेगवेगळ्या झोनचे सगळे डीसीपी, ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत धार्मिक स्थळे आहेत त्या पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असे प्रत्येक जण या मोहिमेत सहभागी झाला होता. सर्वधर्मियांनी दाखविलेला सलोखा हेच मुंबईचे खरेखुरे स्पिरीट आहे. याचा मला विशेष आनंद आहे. -देवेन भारती, पोलिस आयुक्त, मुंबई