Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार

By admin | Updated: November 27, 2015 03:02 IST

अभ्यास करण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना १५ दिवसांपूर्वी मालाड येथे घडली.

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईअभ्यास करण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना १५ दिवसांपूर्वी मालाड येथे घडली. आरोपींनी या मुलीची व्हिडिओ क्लिपदेखील तयार केली असून या क्लिपमुळेच या गुन्ह्याची उकल झाली आहे. त्यानुसार मालाड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. पीडित मुलगी तिच्या मावशीसोबत राहत असून ती दहावीत शिकते. घटनेच्या दिवशी एका मित्राने अभ्यासाच्या बहाण्याने तिला घरी बोलावले होते. यावेळी त्याचे अन्य तीन मित्र आधीपासूनच घरी हजर होते. ही मुलगी घरी आल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार करत घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये तयार केला. हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर तो या मुलीच्या मावशीला मिळाला. याबाबत तिने मालाड पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या चारही मुलांना बुधवारी अटक केली. ही चारही मुले नववी आणि दहावी इयत्तेत शिकणारी असून त्यांची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली. मालाड पूर्व येथील कुरार परिसरातील एका पाच वर्षाच्या बालिकेवर एका १५ वर्षाच्या मुलाने बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर स्थानिकांनी त्याला चोप देत कुरार पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.कुराराच्या गांधी नगर परिसरात पीडीत मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहत असून संबंधित मुलगाही याच परिसरातील आहे. बुधवारी सायंकाळी ती घराबाहेर खेळत होती. त्यावेळी हा मुलगा तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी घरी आली तेव्हा तिची अवस्था पाहुन तिच्या आईने विचारणा केली. तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितला. या घटनेबाबत महिलेने आपल्या पतीला कळवित कुरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत स्थानिकांना समजल्यानंतर त्यांनी या मुलाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणीमध्ये बालिकेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही या मुलावर बलात्कार, पोस्को, तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला बालसुधार गृहात पाठविले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र ठाकूर यांनी सांगितले.