मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे शहर-उपनगरातील अनेक आयोजकांनी उत्सव रद्द केल्याने लाखोंची बक्षिसे मिळविणारा गोविंदा उत्सवात ‘कोरडा’च राहिल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासून शहर-उपनगरातील विविध गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यास बाहेर पडली; मात्र पावसानेही दडी मारल्याने गोविंदा घामाघूम झालेले दिसून आले. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या उत्सवात मुंबई शहर-उपनगरातील ११९ तर ठाण्यातील २१ असे एकूण १४० गोविंदा जखमी झाले. दरम्यान, रायगडमध्ये पाचव्या थरावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईत जखमी झालेल्या ११९ गोविंदांपैकी ९३ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर २६ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
शनिवारी सकाळी आपापल्या एरियातील हंडी फोडून पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘ढाक्कुमाकूम’ करत दहीहंडी पथकांनी शहर-उपनगरातील आयोजनांकडे कूच केली. यात तरुणांसह महिला गोविंदा पथकेही उत्साहात सहभागी झाली. न्यायालयाच्या कचाट्यातून नियमांच्या चौकटीत आल्यामुळे यंदाच्या उत्सवाकडे साऱ्यांचेचलक्ष लागून राहिले होते. मात्र आयोजकांनी उत्सव रद्द केल्यामुळे प्रमुख आयोजने कुठेही दिसून आली नाहीत. त्यामुळे गल्लोगल्ली असलेल्या उत्सवांत दहीहंडी पथके सहा-सात थरांची सलामी देऊन सामील झाली.
दादर येथील आयडियलच्या हंडीला मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींनी हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह द्विगुणित झाला होता. आयडियल बुक डेपो, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री सोनल पवार आणि ‘मुळशी पॅटर्न’ फेम दीप्ती धोतरे या दोघींनी आयडियल बुक डेपोची सेलिब्रेटी दहीहंडी फोडली. या ठिकाणी अभिनेता तुषार दळवी, गायक मंगेश बोरगावकर यांनीही उपस्थिती दर्शविली.आयडियल बुक डेपोने महिला पथकांसाठी पहिल्यांदा व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विक्रोळी मित्रमंडळ महिला गोविंदा पथक, टागोरनगर महिला गोविंदा पथक, तेजस्विनी गोविंदा पथकाने आयडियलची मानाची दहीहंडी फोडली. पुरुष दहीहंडी करडेश्वर गोविंदा पथकाने फोडली, तर माझगांव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथकांनी सात थर लावून सलामी दिली. नयन फाउंडेशनच्या अंध मुलांनी चार थर लावून हंडी फोडली.
पाच बालगोविंदा जखमी१४ वर्षांखालील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्याची परवानगी नसतानाही शनिवारी शहर उपनगरातील उत्सवात पाच बालगोविंदा जखमी झालेत. त्यातील दोन बालगोविंदा रुग्णालयात दाखल असून, तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काळाचौकी येथे राहणारा १२ वर्षांचा विघ्नेश संजय काटकर याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नायर रुग्णालयात दाखल दर्शित मारू या दहा वर्षीय बालगोविंदाच्या उजव्या हाताच्या कोपºयाला दुखापत झाली आहे.पूरपरिस्थितीच्या दृश्यातून आगळीवेगळी सलामीसंस्कृती युवा प्रतिष्ठानच्या प्रो-गोविंदांच्या ठिकाणी ओम साई नवभारत गोविंदा पथकाने सर्जिकल स्ट्राइकचे आणि पूरपरिस्थितीचे दृश्य सादर करून आगळीवेगळी सलामी दिली. तर, स्वामी प्रतिष्ठान येथील उत्सवाच्या ठिकाणी महिलांवर होणाºया अत्याचारांविरोधात संदेश देणारी आगळीवेगळी सलामी ओम समर्थ मित्र मंडळाने दिली.
दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई वाहतूक पोलिसांची कारवाईमुंबई - दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या गोविंदांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1503 गोविंदा, दुचाकीवरून ट्रिपल सीट असलेल्या 194 आणि ड्रकं अँड ड्राईव्हप्रकरणी 31 गोविंदांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. ही आकडेवारी आज रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आली असून अजून कारवाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.