Join us  

VIDEO - 14 जणांच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग! कमला मिल परिसरातील बेकायदा बांधकामावर चालवला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:02 PM

कमला मिल कंपाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर जाग आलेल्या मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे.

ठळक मुद्देवरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला.

मुंबई - कमला मिल कंपाऊंड परिसरात घडलेल्या अग्नितांडवानंतर जाग आलेल्या मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. महापालिकेने शनिवारी लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटसमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. 

त्यानंतर चौफेर टीकेचा सामना करणा-या महापालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. वरळी आणि लोअर परेलमधील स्कायव्हयू कॅफे आणि सोशल या रेस्टॉरंटसनी मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल करुन बेकायदा बांधकामे केली होती अशी माहिती जी-दक्षिण विभागाच्या महापालिका अधिका-यांनी दिली. ही बांधकामे पाडण्यात आली. 

वरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. आज दिवसभर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु राहणार आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिकेने तडकाफडकी पाच अधिका-यांचे निलंबन केले. 

‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पबमधील बेकायदा बांधकाम, आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती बैठकीत दिली.गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उमटले.

कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला. साकीनाका येथे १८ डिसेंबर रोजी फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम आणि आगीशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी विभागातील अधिकारी आणि साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली.

 

स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरताच आयुक्त अजय मेहता यांनी पाच अधिकाºयांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाºयांचे निलंबन केले आहे. यापैकी काही अधिका-यांची यापूर्वीच दुसºया विभागात बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात कमला मिलमधील बांधकामाला परवानगी दिल्याने त्यांना या दुर्घटनेसाठी प्रथमदर्शी जबाबदार धरण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :कमलामिल्स