मुंबई : मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत मुंबई आणि मुंबई बाहेरून मुंबईत एकूण २६५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यापैकी १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, ६६ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्वाइन फ्लू संदर्भात चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाईनवर दररोज ५० हून अधिक कॉल्स येत असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली. शुक्रवार, १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाइचे १७ नवे रुग्ण आढळले, यापैकी १० रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यात गोवंडीच्या ६ महिन्याच्या मुलीला स्वाइनची लागण झाली आहे. तर मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या ४ रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामध्ये ठाण्याच्या दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. फेबु्रवारी महिन्यात मुंबईत स्वाइनचे १९९ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईच्या बाहेरून ६६ रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. स्वाइन फ्लूच्या १३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी १७२ जणांचा स्वाइन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोज मुंबईत स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण आढळत आहेत. पण, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ही परिस्थिती धोकादायक नाही. स्वाइन फ्लूची लस घेण्याची आवश्यकता नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घ्यावी, असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महापालिकेचे आवाहन खासगी रुग्णालयात एखाद्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी औषध उपलब्ध नसल्यास त्या रुग्णाला महापालिकेतर्फे मोफत टॅमिफ्लू देण्यात येईल. पण यासाठी रुग्णालयाने फॅक्स, फोन, एसएमएस द्वारे महापालिकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना प्रिस्क्रिप्शन लिहून देऊन पाठवल्यास औषध मिळणार नाही. खासगी रुग्णालयाचे नाव, रुग्णाचे नाव, डॉक्टरचे नाव हा तपशील महापालिकेस पाठवल्यास त्या रुग्णाला मोफत औषध देण्यात येईल.