Join us
Daily Top 2Weekly Top 5

योजनांसाठी १३५ कोटी मंजूर

By admin | Updated: May 27, 2014 02:23 IST

रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यंदा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनांकरिता १३५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यंदा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनांकरिता १३५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे. याच बैठकीत अनुसूचित जाती उपयोजनेच्या १९० कोटींच्या, टी.एस.पी. योजनेच्या १०६ कोटींच्या तर ओ.टी.एस.पी. योजनेच्या ४०४ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ हे उपस्थित होते. येत्या ३१ आॅगस्टच्या सुमारास राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता विचारात घेवून, येत्या ३० जूनपर्यंत निविदा प्रक्रिया सर्व संबंधित अधिकार्‍यांनी पूर्ण करुन, १ जुलै रोजी योजनांच्या कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर्स) देण्यात येतील याची कटाक्षाने काळजी घेण्याचे आदेश तटकरे यांनी जिल्हाधिकारी भांगे यांना दिले आहेत. १ जुलै रोजी कार्यादेश दिलेले असल्याने आचारसंहितेच्या काळातही कामे पूर्ण होण्याची प्रक्रिया यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षीच्या मंजूर आराखड्यानुसार निधीचा विनियोग जवळपास १०० टक्के झाला आहे. गतवर्षी सर्वसाधारण योजनेचा निधी १२७ कोटी रुपये होता. त्यामध्ये त्या आधीच्या वर्षीचा व्यपगत निधी शासनाकडे पाठपुरावा केल्याने परत मिळाल्याने, गतवर्षीची प्रत्यक्ष आर्थिक तरतूद १५१ कोटी ८६ लाख रुपये झाली होती. त्यातील १४८ कोटी ८८ लाख रुपयांचे प्रत्यक्ष निधी वितरण झाले होते. त्यापैकी ८९.३६ टक्के म्हणजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीचा प्रत्यक्ष विनियोग झाला असल्याचे तटकरे यांनी पुढे सांगितले. गतवर्षी अनुसूचित जाती उपयोजनेकरिता १४० कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यातील ३३ कोटी ३२ लाख रुपयांची आर्थिक तरतूद होवून तो संपूर्ण वितरीत करण्यात आला आणि प्रत्यक्षात ९९.२१ टक्के म्हणजे ३३ कोटी ६ लाख रुपये निधी विनियोग झाला आहे. टी.एस.पी. आणि ओ.टी.एस.पी. योजनेंतर्गत अनुक्रमे ८५.५५ टक्के व ९८.२४ टक्के निधी विनियोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)