नवी मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थायी समितीने दिवाळीसाठी १३,४०० रूपये व कंत्राटी कामगारांना ५,९०० रूपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वांचे लक्ष सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. यामुळे महापालिकेमध्ये उद्घाटन व भूमिपूजनाच्या कामांना वेग आला आहे. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर दिवाळीपर्यंत पालिकेच्या सभा होणार नाहीत. यामुळे दिवाळीत कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित रहावे लागू नये यासाठी प्रशासनाने स्थायी समितीमध्ये तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या सभेत मांडण्यात आला. प्रशासनाने कायम कर्मचाऱ्यांना १३ हजार व कंत्राटी कामगारांना ५५०० रूपये रक्कम सुचविली होती. स्थायी समितीने यामध्ये ४०० रूपयांची वाढ केली आहे. गणेश उत्सवामध्येच बोनस मंजूर झाल्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारण सभा होणार आहे. सदर सभेमध्ये सानुग्रह अनुदानाचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पालिका कर्मचा-यांना १३,४०० रूपये बोनस
By admin | Updated: August 28, 2014 00:15 IST