मुंबई : लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या चोऱ्या, महिला प्रवाशांवरील हल्ले, दोन स्थानकांदरम्यान लोकल प्रवाशांना चोरांकडून करण्यात येत असलेले टार्गेट पाहता रेल्वे पोलिसांनी अशी संवेदनशील ठिकाणे शोधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तब्बल १३२ ठिकाणे रेल्वे पोलिसांनी शोधली असून, त्या ठिकाणांवर खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा चोर घेतात आणि प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांनाही टार्गेट करतानाच अनेक वेळा चोरांकडून जीवघेणे हल्ले केले जातात. ठाणे, गोरेगाव, वाशी या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अशी ठिकाणे शोधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३२ धोकादायक संवेदनशील ठिकाणे रेल्वे पोलिसांकडून शोधण्यात आली. यात ७६ मध्य रेल्वेमार्गावरील आणि ५६ पश्चिम रेल्वेमार्गावरील ठिकाणे असल्याचे जीआरपी आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले. या परिसरात आॅल आऊट व कोम्बिंग आॅपरेशन सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व कर्मचारी आणि अधिकारी मोहिमेवर येणार असल्याचे सिंगल म्हणाले. छेडछाडीचे, लोकलच्या डब्यावरून प्रवास करणारे, चेन आणि पाकीटमारी करणारे, दोन स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाजाजवळ डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर हल्ले करणारी ठिकाणे शोधण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वेमार्गांवर १३२ संवेदनशील ठिकाणे
By admin | Updated: August 28, 2014 01:34 IST