Join us  

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण; प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:43 PM

प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी १३ वर्षे पूर्ण होत असली, तरी शहरावरील दहशतवादाचे सावट आजही कायम आहे. यातच,  राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी, लष्कर-ए तोयबाचा मुख्य सूत्रधार ‘हाफिज सईद’ अफगाणिस्तानात अमेरिकेने सोडलेल्या शस्त्रास्त्रांसह खैबरपख्तुनख्वामध्ये जिहादींना एकत्र करत असल्याने चिंता व्यक्त करत सर्व यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत मायानगरी मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये ३४

विदेशी नागरिकांसह १६६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालत, आतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. त्याला फासावर चढवण्यात तपास यंत्रणांना यश आले. मात्र, या हल्ल्यात १८ पोलीस जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंप्रमाणेच शक्तिशाली अशा शिघ्रकृती दल आणि फोर्सवनची स्थापना करण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचा सराव दररोज या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटिव्ही यंत्रणा आणि यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आले आहे. पोलिसांकडून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.दीक्षित यांनी ट्विट करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये   “लष्कर-ए तोयबाचा मुख्य सूत्रधार ‘हाफिज सईद’ अफगाणिस्तानात अमेरिकनांनी सोडलेल्या शस्त्रास्त्रांसह खैबरपख्तुनख्वामध्ये जिहादींना एकत्र करत आहे. मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला याच लोकांनी केला होता, हे विसरू शकत नाही. एजन्सी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लामुंबई