Join us

संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडे भाडे व त्यावरील व्याजापोटी १२९.९२ कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू, रहिवासी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ...

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू, रहिवासी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भाडे व त्यावरील व्याजापोटी १२९.९२ कोटी रुपये थकीत आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू, रहिवासी यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू, रहिवासी यांनी थकीत संपूर्ण भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय मंडळामार्फत घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे विनोद घोसाळकर यांनी दिली. सदर योजना दोन टप्प्यांत लागू केली जाणार असून ही योजना फेब्रुवारी-२०२१ व मार्च -२०२१ या दोन महिन्यांमध्ये लागू राहणार आहे.

पहिल्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू, रहिवासी यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ३१ मार्चपर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. जे भाडेकरू रहिवासी संपूर्ण थकीत रक्कम भरतील त्यांनाच ही सवलत लागू राहील.