Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणासाठी १२ हजार नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST

पालिका प्रशासन; मागच्या तुलनेत नमुन्यांची संख्या दुप्पटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने शहर, उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील ...

पालिका प्रशासन; मागच्या तुलनेत नमुन्यांची संख्या दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने शहर, उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षण हाती घेतले आहे. याद्वारे कोरोना संसर्गाची शहरातील स्थिती अभ्यासण्यात येते. १ मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात २४ विभागांतून प्रत्येकी ५०० नमुने गोळा करण्यात येतील. सर्वेक्षणाचा कालावधी सुमारे १० दिवसांचा आहे. मागील सेरो सर्वेक्षणाच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यातील या सर्वेक्षणात दुप्पट नमुने गोळा करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या सर्वेक्षण अहवालातून सामान्यांच्या शरीरात तयार होणाऱ्या प्रतिपिंडाची कितपत निर्मिती झाली हे अभ्यासण्यात येते. मागील वर्षी महानगरपालिकेने दोन सेरो सर्वेक्षण हाती घेतले होते. याअंतर्गत एफ साऊथ (माटुंगा), आर नॉर्थ (दहिसर), एम (चेंबूर) या विभागांत जुलै आणि ऑगस्टमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात आले. अहवालानुसार, इमारतींमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांच्या तुलनेत झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये प्रतिपिंड अधिक असल्याचे दिसून आले होते. इमारतींमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांमध्ये १६ टक्के, तर झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये ५७ टक्के प्रतिपिंड असल्याचे निदर्शनास आले. हेच प्रमाण ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे १८ आणि ४५ टक्के इतके होते.

* पालिका स्वतंत्रपणे करणार सर्वेक्षण

मागील सेरो सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेने ६ हजार नमुने जमा केले होते. मात्र यंदाच्या सर्वेक्षणासाठी १२ हजार नमुने जमा करण्यात येतील. मागील सर्वेक्षण हे मुंबई महानगरपालिका, नीती आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थांनी मिळून केले होते. तिसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षण पालिका स्वतंत्रपणे करीत आहे.

........................