Join us

मतदार पुनर्नोंदणी मोहिमेस १२० शिक्षकांचा नकार

By admin | Updated: May 2, 2015 22:43 IST

ऐन उन्हाळी सुटीत मतदार पुनर्नोंदणी व याद्यांत सुधारणा करण्याच्या मोहिमेस पालिकेच्या १२० शिक्षकांनी नकार दिल्याने निवडणूक प्रशासन व शिक्षण मंडळाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

राजू काळे, भार्इंदरऐन उन्हाळी सुटीत मतदार पुनर्नोंदणी व याद्यांत सुधारणा करण्याच्या मोहिमेस पालिकेच्या १२० शिक्षकांनी नकार दिल्याने निवडणूक प्रशासन व शिक्षण मंडळाची चांगलीच पंचाईत झाली आहे.पालिकेच्या ३५ शाळांत शिक्षण मंडळांतर्गत सुमारे १९० शिक्षक कार्यरत आहेत. राज्याच्या शिक्षण संचालकांनीदेखील शिक्षकांना कोणतीही शाळाबाह्य कामे देण्यात येऊ नयेत, अशा आशयाचा पत्रव्यवहार राज्य शासन व निवडणूक आयोगाकडे केला आहे. तरीदेखील, मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मीरा-भार्इंदर मनपाच्या १२० शिक्षकांना मतदार याद्या पुनर्नोंदणी, त्यातील दुरुस्तीच्या विशेष मोहिमांचे कार्यादेश धाडण्यात आले आहेत. ही मोहीम १ मार्चपासून सुरू झाली असून ती ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांना पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पाठविलेले कार्यादेश स्वीकारण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. यानंतरही निवडणूक प्रशासनाने ३० एप्रिलला तिसरा कार्यादेश शिक्षण मंडळाकडे सुपूर्द केला असून त्यालाही शिक्षकांनी नकार दिला आहे.