Join us

जिल्ह्यात पगाराविना १०८ अधिकारी

By admin | Updated: May 12, 2015 03:33 IST

सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे या वर्षी बजेट उशिरा झाल्याने कोषागार विभागाने बिले स्वीकारली नाहीत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य

आविष्कार देसाई, अलिबागसरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे या वर्षी बजेट उशिरा झाल्याने कोषागार विभागाने बिले स्वीकारली नाहीत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १०८ अधिकाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहेत. ही रक्कम तब्बल एक कोटी २४ लाख १९ हजार ८५८ रुपये इतकी आहे.जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ राहावी, यासाठी जिल्ह्यात ५४ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८८ सहप्राथमिक केंद्र, १५ तालुका आरोग्य अधिकारी, त्याचप्रमाणे प्रत्येकी एक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी असे एकूण १०८ अधिकारी तैनात केले आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी ते सातत्याने झटत असतात.एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना किमान एक वर्ष ग्रामीण भागात सेवा करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये २४ डॉक्टर ग्रामीण भागात काम करीत असून त्यांचे वेतनही थकलेले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ते सेवा देत असतील, परंतु त्यांचे सुमारे १२ लाख रुपयांचे वेतन थकल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. अशाही परिस्थितीमध्ये सर्व अधिकारी त्या-त्या विभागामध्ये आपली सेवा देत आहेत.सरकारच्या प्रशासकीय कामातील दप्तर दिरंगाईमुळे बजेटला उशीर झाला. त्यामुळे वेतनासाठीचा निधी मंजूर व्हायलाही वेळ गेल्याने सर्वच कामांना आता उशीर झाल्याचे दिसून येते. या आधी असा उशीर झाला नसल्याची कुजबूज अधिकारी आणि डॉक्टर्स यांच्यातून दिसून आली.