Join us  

तंजावर येथे १००व्या नाट्य संमेलनाला प्रारंभ; रसिक प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

By संजय घावरे | Published: December 27, 2023 9:06 PM

मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून झाली सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून तंजावर येथे १०० व्या मराठी नाट्य संमेलनाला प्रारंभ करण्यात आला. तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात शहाजी यांचे 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे मराठीतील पहिले नाटक असल्याचे उद्गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी काढले.

१०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ सोहळ्यात नटराज पूजन केल्यानंतर शाहराजांच्या वाङमयाला पुष्पांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तुरूवेल्लुवन, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपक जेकब उपस्थित होते. यावेळी नाट्य, नृत्य, गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी 'लक्ष्मी नारायण कल्याण' या नाटकातील एक प्रवेश सादर केला. रसिक प्रेक्षकांचा या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी गज्वी म्हणाले की, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलुगू, १ संस्कृत, १ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून, ते मराठी रंगभूमीसोबतच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासकही होते. त्यांनी बारामास आणि षडऋतुवर्णन ही काव्ये लिहिली असून, ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते, असेही गज्वी म्हणाले.

आपल्या भाषणात शिवाजी राजे भोसले म्हणाले की, व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. राजांमुळेच मला हा सन्मान मिळत आला. १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे पदाधिकारी तंजावरला आले. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी, सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, नियामक मंडळ सदस्य आनंद कुलकर्णी शाहराजांना वंदन करायला आल्याचा आनंद झाल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद गोपाळ यांनी केले.

टॅग्स :मराठी नाट्य संमेलन