लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांसंबंधित १० हजार तक्रारी आल्या, तर अडीच हजार गुन्हे नोंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी प्रजासत्ताकदिनी दिली. नवीन सायबर पोलीस ठाणे अशाप्रकारच्या तक्रारी मार्गी लावण्यास उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांमध्ये २ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात येतील. सायबर गुन्ह्यासाठी तक्रारदाराला बीकेसी येथील सायबर पोलीस ठाणे गाठावे लागत होते. मात्र, आता प्रादेशिक स्तरावर स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आल्याने ते नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. या सायबर पोलीस ठाण्यात ५० टक्के मनुष्यबळ महिलांचे असेल असे ते म्हणाले, तसेच ९४ पोलीस ठाण्यांतील स्वागत कक्षात सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडणे अधिक सोयीस्कर होईल. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असेही त्यांनी नमूद केले.
...................