लवकरच आणखी एक पुरवणी आरोपपत्र होणार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळा उघड होताच बीएआरसीच्या माजी सीईओ पार्थो दासगुप्ताने रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचे व्हॉट्सॲप संवाद डिलीट केले. त्यात, दासगुप्ता यांनी डिलीट केलेले एक हजारांहून अधिक स्क्रीनशॉट सीआययूच्या हाती लागले आहेत. त्यानुसार या प्रकरणात लवकरच आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
यापूर्वी दासगुप्ता यांच्या मोबाइलमधून गोस्वामी यांच्या सोबतचे व्हॉट्सअॅप संवाद हाती लागले. मात्र यातील बराचसा भाग डिलीट केल्यामुळे तो अर्धवट होता. हे डिलीट केलेले साहित्य पुन्हा मिळविण्यास सीआययूला यश आले आहे. त्यात दासगुप्ता यांना संवादाचे स्क्रीनशॉट काढण्याची सवय होती. टीआरपी घोटाळा उघड होताच, त्यांनी हे स्क्रीनशॉट डिलीट केले. असे एक हजारांहून अधिक स्क्रीनशॉट गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. यातील काही पुरावे म्हणून नवीन पुरवणी आरोपपत्रात जोडण्यात येणार असल्याचेही सीआययूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अन्य पुराव्यांचाही यात समावेश असणार आहे.