- मनोहर कुंभेजकरमुंबई - वर्सोवा मेट्रो जवळील माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळा तर्फे दरसालाप्रमाणे यावर्षीही आजच्या १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त भव्य शोभायात्रा व बाईक रॅलीचे आयोजन केले होते. सदर शोभायात्रा चाचा नेहरु उद्यान, माॅडेल टाऊन, जे.पी.रोड सातबंगला येथुन सुरुवात होवून वर्सोवा गावात संपन्न झाली. शोभायात्रेत १००० नागरीक सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत घोडे ,बैलगाडया आदिवासी नृत्य ,कोळी नृत्य, कोळी बॅन्ड पथक, कोळी डान्स, महिला लेझीम, लाठी काठी दांडपट्टा सादरीकरण, ढोल पथक ,वारकरी भजन ,मंगळागौर सादरीकरण ,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांवर चित्ररथ , महाराष्ट्रातील संतावर चित्र रथ, भव्य रांगोळी आदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आली.
सदर कार्यक्रमात महानगरपालिकेतील सफाई कामगारांना चादर वाटप, महिलांना साडी वाटप ,रुग्णाना व्हील चेअर, अपंगाना सायकल वाटप करण्यात आले. तसेच वेशभुषा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्याचे पारितोषिक रोख रक्कम व स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अशी माहिती आयोजक व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा ) आंबेरकर यांनी दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्धव सेनेचे आमदार, विभागप्रमुख ॲड. अनिल परब उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात स्वप्नाक्षय मित्र मंडळाचा सामाजिक कार्याचा गौरव केला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या येथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वप्नांक्षय मित्र मंडळाचे संस्थापक देवेंद्र ( बाळा )आंबेरकर,अध्यक्ष राजेश ढेरे,सरचिटणीस अशोक मोरे व संजिव कल्ले (बिल्लू), सल्लागार अनिल राऊत व प्रशांत काशिद, सिध्देश चाचे, स्वप्निल शिवेकर, दिनेश गवलानी, योगेश गोरे, अजय यादव,विकी गुप्ता आदींनी गेली १५ दिवस शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.