Join us  

मध्य रेल्वेच्या १०० उन्हाळी विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:03 AM

या सर्व उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहेत.

मुंबई :  उन्हाळ्याच्या सुटी साजरी करण्यासाठी आणि लग्नसराईमुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून यंदा १०० उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहेत. या उन्हाळी विशेष गाड्या पुणे-सावंतवाडी, पनवेल-करमली, पनवेल-सावंतवाडी आणि पुणे जंक्शन-अजनीदरम्यान धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहेत.

पुणे-सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या)  स्पेशल पुण्याहून २ एप्रिल  ते ४ जून  दर रविवारी रात्री ९.३०  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३०  वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर विशेष गाडी ५  एप्रिल ते ७ जूनपर्यंत दर बुधवारी सकाळी १०.१०  वाजता सावंतवाडी रोडवरून निघून त्याच दिवशी पुण्याला रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबणार आहेत.

पनवेल-करमाळी स्पेशल (१८  फेऱ्या)-  विशेष गाडी  पनवेलहून ३ एप्रिल  ते ५ जूनपर्यंत दर सोमवारी रात्री ९.३०  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०  वाजता करमाळीला पोहोचेल.  विशेष गाडी ४  एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर मंगळवारी सकाळी ९.२० वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३०  वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे.

पनवेल-सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या)- विशेष गाडी  पनवेल येथून ४ एप्रिल  ते ६ जूनपर्यंत दर मंगळवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०  वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.  विशेष गाडी ३ एप्रिल  ते ५ जूनपर्यंत दर सोमवारी सावंतवाडी रोडवरून सकाळी १०.१०  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३०  वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपून, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल. 

पुणे जंक्शन ते अजनी स्पेशल

पुणे जंक्शन - अजनी स्पेशल (२२ फेऱ्या)-  स्पेशल पुणे जंक्शन ५ एप्रिल  ते १४ जूनपर्यंत दर बुधवारी दुपारी ३.१५  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५०  वाजता अजनीला पोहोचेल. विशेष गाडी  ६ एप्रिल ते १५  जूनपर्यंत दर गुरुवारी संध्याकाळी ७.५०  वाजता अजनीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५  वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना दौंड मार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा असणार आहे.एलटीटी-कन्याकुमारी (१८ फेऱ्या)- विशेष गाडी  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ एप्रिल  ते १ जूनपर्यंत दर गुरुवारी दुपारी ४ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.२०  वाजता कन्याकुमारीला पोहोचेल.  स्पेशल कन्याकुमारी ८ एप्रिल  ते ३ जूनपर्यंत दर शनिवारी दुपारी २. १५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता पोहोचेल.

टॅग्स :पर्यटनमध्य रेल्वे