Join us
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिव्यांसाठी जुहू चौपाटीवर १२ मीटर उंचीचे १०० खांब

By admin | Updated: January 2, 2017 07:03 IST

सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या जुहू चौपाटी किनाऱ्यावर १२ मीटर उंचीचे १०० खांब उभे करण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर शिडाच्या बोटीच्या आकाराचे फायबर क्लॉथ मॉडेल असेल.

मुंबई : सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या जुहू चौपाटी किनाऱ्यावर १२ मीटर उंचीचे १०० खांब उभे करण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर शिडाच्या बोटीच्या आकाराचे फायबर क्लॉथ मॉडेल असेल. त्यावर विविध रंगांच्या छटा उमटविणारे एलईडी दिवे असतील, तसेच काही दिवे वाळूवरदेखील प्रकाशझोत टाकतील. हे सर्व दिवे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन संगणकाच्या सहाय्याने विविध रंगांची उधळण करतील. सोबत फायबर ग्लासचे मीडिया ट्रीदेखील लावले जाणार असून, त्यातही एलईडी दिवे असतील. ते वेगवेगळ्या आकृती, आकार व रंग बदलत राहतील. या प्रकल्पाची किंमत सुमारे २० कोटी रुपये असून, हा प्रकल्प ५ महिने कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता जयंत बनसोड यांनी दिली. जुहू चौपाटी येथे सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर स्नेहल आंबेकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावर केलेल्या प्रकल्पाच्या प्रास्ताविकात जयंत बनसोड बोलत होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प मार्गी लागला आहे. महापालिकेच्या विविध ९६ शाळांचेदेखील लवकरच लोकार्पण होणार आहे.- स्नेहल आंबेकर, महापौरमुंबईतील विविध सागरी किनाऱ्यांवर सुशोभित विद्युत रोषणाई करावयाचे नियोजित असून, त्यातील हा पहिला टप्पा आहे. जुहू ते वर्सोवा, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या ठिकाणीदेखील सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.- यशोधर फणसे, अध्यक्ष, स्थायी समिती, मुंबई महापालिकाप्रारंभी हायमास्ट दिवे एवढीच मर्यादित संकल्पना असलेला हा प्रकल्प, लोकप्रतिनिधींच्या सूचनेअंती सुशोभित विद्युत रोषणाई स्वरूपात पोहोचला आहे.- अमित साटम, आमदार