Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील दोघांना जेईई मेन्समध्ये १०० पर्सेँटाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:06 IST

देशातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेँटाइललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जेईई मुख्य परीक्षेचा मार्च सेशनचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल एनटीए ...

देशातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेँटाइल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जेईई मुख्य परीक्षेचा मार्च सेशनचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आला असून देशातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना यामध्ये १०० पर्सेँटाइल मिळाले. ही संख्या फेब्रुवारी सत्राच्या निकालापेक्षा दुप्पट आहे. यावेळी १०० पर्सेँटाइल स्कोअर करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांपैकी अथर्व अभिजीत तांबट आणि गार्गी मार्कंट बक्शी हे दाेघे महाराष्ट्रातील आहेत. यात दिल्लीच्या सिद्धार्थ कालरा, काव्या चोप्रा, तेलंगणाच्या बन्नूरू रोहित कुमार रेड्डी, मदुर आदर्श रेड्डी आणि जोसयुला व्यंकट आदित्य, पश्चिम बंगालच्या ब्रतिन मंडल, बिहारच्या कुमार सत्यदर्शी, राजस्थानच्या मृदुल अग्रवाल, जेनिथ मल्होत्रा आणि तमिळनाडूच्या अश्विन अब्राहम यांचाही समावेश आहे.

मार्च महिन्यातील परीक्षा एनटीएने १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित केली होती. सध्या पेपर-१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात एकूण ६,१९,६३८ उमेदवार सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून १०० पर्सेँटाइल मिळविणारा अथर्व अभिजीत तांबट हा नवी मुंबईचा आहे, तर गार्गी मार्कंट बक्शी ही मूळची नाशिकची असून मुंबईत शिक्षण घेत आहे. जेईई ॲडव्हान्ससाठी सध्या तिने लक्ष केंद्रित केले असून मुंबईच्या आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेण्याची तिची इच्छा आहे. मुंबईच्या दादर येथील पेस कनिष्ठ महाविद्यालयात ती शिक्षण घेत असून ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बरीच तयारी करून घेतल्याचे गार्गीच्या वडिलांनी सांगितले. ते स्वतः डेंटिस्ट असून गार्गीच्या यशामुळे अत्यानंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, जेईई-मेन परीक्षा या वर्षी ४ सेशनमध्ये होणार असून यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च सेशनमधील परीक्षा पूर्ण होऊन त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. एप्रिल व मे मधील सेशन्सनंतर या चारही परीक्षेतील सर्वोत्तम गुणांच्या आधारावर अंतिम निकाल देण्यात येईल. दुसऱ्यांदा ही परीक्षा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू) घेण्यात आली.

............................