Join us  

पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या तिजोरीचाही १०० कोटींचा ‘विकास’; १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:36 AM

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्विकास प्रस्तावांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने परवानगी दिल्याने, त्या प्रकल्पांच्या प्रीमियममधून म्हाडाच्या तिजोरीत तब्बल १०० कोटी रुपयांच्या आसपास घसघसशीत रक्कम जमा झाली आहे.

- अजय परचुरेमुंबई : म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्विकास प्रस्तावांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने परवानगी दिल्याने, त्या प्रकल्पांच्या प्रीमियममधून म्हाडाच्या तिजोरीत तब्बल १०० कोटी रुपयांच्या आसपास घसघसशीत रक्कम जमा झाली आहे. याला म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनीदेखील दुजोरा दिला आहे.मुंबईत सध्या म्हाडाचे ५६ गृहनिर्माण प्रकल्प आहेत, यात अनेक वसाहती आहेत. २०१० सालापासून या गृहनिर्माण प्रकल्पातील वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्विकास धोरणात बदल करत, पुनर्विकास प्रस्तावांना फक्त हाउसिंग स्टॉक आकारत परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रीमियमचा पर्याय रद्द करत हाउसिंग स्टॉकचाच पर्याय विकासकांकडे ठेवल्याने त्यांनी पुनर्विकास प्रकल्पांकडे पाठ फिरविेली. त्यामुळे पुनर्विकास रखडला. यातून तोडगा काढण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने धोरणात पुन्हा बदल करत, प्रीमियम आणि हाउसिंग स्टॉकचा पर्याय विकासकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता विकासक आणि म्हाडाच्या सोसायट्या पुन्हा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडे परत येत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांत पुनर्विकासाचे तब्बल १०७ प्रस्ताव समोर आले. त्यातील ४९ प्रस्तावांची योग्य ती छाननी करून, म्हाडाच्या मुंबई मंडळाने या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. ५ प्रस्तावांमधील पुनर्विकासाचा प्रीमियम म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे जमा झाला असून, ही रक्कम १०० कोटी रुपयांच्या घरात आहे.पैशांची भर पडणारम्हाडाकडे आलेल्या १०७ पैकी ४९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, उरलेल्या ५८ प्रस्तावांनाही थोड्याच दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात उरलेल्या प्रस्तावांचा प्रीमियमही जमा होणार असल्याने म्हाडाच्या तिजोरीत पैशांची आणखी भर पडणार आहे.

टॅग्स :म्हाडा