Join us  

तीन लाखांच्या खंडणीसाठी १० वर्षांच्या मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:03 AM

तीन लाखांची खंडणी देण्याची मागणी चिठ्ठी आणि फोनद्वारे केल्याची माहितीही वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांना १७ जानेवारी रोजी मिळाली.

ठाणे : तीन लाखांच्या खंडणीसाठी १० वर्षांच्या मुलाचे ठाण्यातून अपहरण करणाऱ्या कल्पनाथ चौहान (५३) आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर चौहान (४८, रा. एकतानगर, नारपोली, भिवंडी) या दोघांनाही वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांच्या पथकांनी भिवंडीतून अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून खंडणीतील तीन लाखांच्या रोकडीसह या मुलाचीही सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शुक्रवारी दिली.

वागळे इस्टेट भागात राहणारे योगेंद्रकुमार आणि मनिता जैस्वार यांचा मुलगा क्रिश (वय १० वर्षे) याचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी १३ जानेवारी रोजी दाखल केली होती. त्याच्या सुटकेसाठी तीन लाखांची खंडणी देण्याची मागणी चिठ्ठी आणि फोनद्वारे केल्याची माहितीही वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांना १७ जानेवारी रोजी मिळाली. खंडणीची रक्कम जैस्वार यांच्या घराजवळील टीव्ही दुरुस्त करणारा कल्पनाथ चौहान याच्यामार्फत दादर रेल्वे स्थानक येथे पाठवून द्यावी, असेही एका चिठ्ठीद्वारे सांगण्यात आले होते. पण, याबाबत पोलिसांसह कुठेही वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील, असेही संबंधित अपहरणकर्त्यांनी त्यांना फोनद्वारे बजावले होते.ही माहिती मिळताच अंबुरे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळी पथके तयार केली.

पोलिसांनी साध्या वेशातून काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने जैस्वार यांच्या घराजवळ गुरुवारी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे योगेंद्रकुमार यांनी स्वत:कडील आणि काही कर्जाऊ रक्कम अशी तीन लाखांची रोकड कल्पनाथ याच्याकडे दिली. त्या वेळी सापळ्यातील पोलिसांनी एकमेकांशी संपर्क साधून त्याच्यावर पाळत ठेवली. तो दादरला जाण्याऐवजी रिक्षाने माजिवडामार्गे भिवंडीतील अंजूरफाटा येथे पोहोचला. तो नारपोली, एकतानगर येथील एका घरात शिरल्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले.

टॅग्स :गुन्हेगारी