Join us  

रविवारपासून बेकायदा पार्किंगसाठी १0 हजार; वाहनतळाच्या एक किमी परिसरातील वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:24 AM

येत्या रविवारपासून हा नियम अमलात येणार आहे.

मुंबई : वाहनतळालगतच्या एक कि.मी. परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहन मालकाकडून तब्बल दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शवीत प्रस्तावात सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता वाहनतळापासून ५०० मीटर परिसर आणि महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गाडी उभी केल्यास तब्बल दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. येत्या रविवारपासून हा नियम अमलात येणार आहे.

मुंबईत १४६ ठिकाणी ३४ हजार ८०८ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येत असल्याने मुंबईत वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनतळांलगतचा एक कि.मी. परिसर, दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परंतु, वाहनतळासाठी महापालिकेकडून जादा एफएसआय लाटणाºया विकासकांनी जागा वापरली, मात्र वाहनतळ अद्याप पालिकेच्या ताब्यात दिलेले नाहीत. त्यामुळे आधी हे वाहनतळ विकासकांकडून ताब्यात घेण्याची सूचना सर्व नगरसेवकांनी केली होती. मात्र प्रशासनाने एक कि.मी. ऐवजी वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरात पार्किंगला मनाई केली आहे. हा नियम ७ जुलैपासू न मुंबईत लागू होणार आहे.

नो पार्किंग झोनमध्ये गाडी उभी करणाºया वाहन मालकाला टोइंगचे शुल्क आणि दंडाची रक्कमही भरावी लागणार आहे. असे फलक आता मुंबईत सर्वत्र लावण्यात येत आहेत. परंतु, विकासकांनी लाटलेले वाहनतळ ताब्यात घेण्याबाबत पालिका प्रशासन काहीच बोलत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच ही कारवाई सुरू होत आहे. या प्रकरणी पालिका महासभेत आवाज उठविणार, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.अन्यथा वाहन उचलून नेणार...मुंबईत उपलब्ध १४६ वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात, रस्त्यावर आणि महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात येत आहेत. या ठिकाणी अनधिकृत पार्किंग आढळून आल्यास त्यावर दहा हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. दंडाची ही रक्कम न भरल्यास ते वाहन टोइंग मशीनद्वारे उचलून नेण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :पार्किंग