Join us  

वसईत ऑक्सिजनअभावी १० रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:06 AM

नालासोपारा : वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या गॅस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने नालासोपाऱ्याच्या दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ...

नालासोपारा : वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या गॅस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने नालासोपाऱ्याच्या दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. दरम्यान, वसईत केवळ तीन तास पुरेलइतकाच ऑक्सिजन असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत ५ हजार ९६८ कोरोनाचे रुग्ण असून, ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. यातील काही रुग्णांना ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने ऑक्सिजनची नितांत गरज असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. श्रीप्रस्था येथील तीन कोरोना रुग्णांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती राजीव पाटील यांनी दिली, तर संध्याकाळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील विनायका हॉस्पिटलमध्ये सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मृतांच्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलबाहेर जोरदार हंगामा केला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या तुळींज पोलिसांनी संतप्त नातेवाइकांना बाजूला करून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली. दरम्यान, विनायका हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी सोमवारी दुपारपर्यंत १० ऑक्सिजन गॅस सिलिंडर पुरविण्यात आले होते. परंतु, तेथे सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी आणि लोकांनी गर्दी केल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

रायगड येथील जेएसडब्ल्यूच्या ऑक्सिजनचे फिलिंग स्टेशन येथून वसई-विरार महापालिकेला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जातो. वसई तालुक्यात गॅलेक्सी आणि स्पीड हे दोन रिफलर सेंटर आहेत. हे ऑक्सिजन सिलिंडर वसईत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. मनपाकडे सध्या तीन तास उरेल इतका ऑक्सिजन असल्याची माहिती माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या मेसेजमधून देण्यात आली आहे. ऑक्सिजन मिळाला नाही तर कोरोना रुग्णांचे हाल होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. नालासोपाऱ्याच्या या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळपासून ऑक्सिजनमुळे दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी नगरसेवक किसन मामा बंडांगळे यांचा मृत्यूही ऑक्सिजन न मिळाल्याने झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.