Join us  

१० कोटी डोस २०० रुपयांना, नंतर हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 5:58 AM

‘सीरम’चे सीईओ आदर पुनावाला यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र सरकारच्या खास विनंतीवरून आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सुमारे १० कोटी कोविशिल्ड लशीचे डोस २०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. मात्र खासगी वितरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर हाच डोस १ हजार रुपयांना विकला जाईल, असे या लशीचे उत्पादक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी येथे स्पष्ट केले.

युरोप, अमेरिका, रशिया, चीन आदी जगातील कुठल्याही देशांमध्ये एवढ्या कमी किमतीत ही लस उपलब्ध करून दिली जात नाही, असा दावाही पुनावाला यांनी यावेळी केला. ‘सीरम’मध्ये उत्पादीत झालेली कोविड-१९ वरील कोविशिल्ड लस मंगळवारपासून (दि. १२) पहिल्यांदाच देशभर पाठवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुनावाला माध्यमांशी बोलत होते. येत्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांत २०० रुपये प्रती डोस याच दराने तब्बल १० कोटी डोस पुरवण्याचे आश्वासन आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्यांदा स्वदेश, नंतर परदेश...दर महिन्याला पाच ते सहा कोटी कोविशिल्ड डोस तयार करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. पहिल्यांदा देशात पुरेसा पुरवठा झाल्यानंतर इतर देशांना पुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जाईल. गेले आठ-नऊ महिने संशोधन, चाचण्या, विविध परवानग्या, उत्पादन अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप आव्हानात्मक होते. मात्र या सर्व वाटचालीत आमच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान देत आज अखेरीस लस सर्वसामान्य देशवासियांपर्यंत पोहोचवली. आमच्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे.     - आदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

n देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत लोक यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या