ठाणे : जलयुक्त शिवार योजनेसाठी मुंबई, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास संस्थेने मदत केली आहे. संस्थेने राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ३४ कोटींचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी या संस्थेने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १ कोटीचा धनादेश सुपुर्द केला आहे.शासनाने राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखी महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना हाती घेऊन दरवर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या वेळी शासनाने शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योजक यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून धनादेश सुपुर्द करताना न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे, व्यासचे विश्वस्त नितीन कदम, प्रवीण नाईक, सतीश पाडावे, स्मिता बांद्रेकर आदी उपस्थित होते.‘‘मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास मान देऊन मुंबई आणि उपनगरे वगळता राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटीचे अर्थसाहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आज ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केला,’’ असे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)योजनेंतर्गत जिल्ह्यातील २६ गावांची निवड केली आहे. त्यासाठी ४० कोटी २० लाखांचा खर्च अपेक्षित असून, १० कोटी विविध शासकीय संस्थांच्या माध्यमांतून उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार, ४५० कामे सुरू झाली आहेत.- डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी, ठाणे
‘जलशिवार’साठी सिद्धिविनायककडून १ कोटी
By admin | Updated: April 17, 2015 01:34 IST