स्वस्त डेटाच्या नादात ५ रुपये मोजायलाही युजर्सचा नकार! नक्की प्रकरण काय
‘डिजिटल इंडिया’च्या प्रवासात सार्वजनिक वाय-फाय हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. मात्र, भारतीयांच्या ‘मोफत इंटरनेट’च्या मानसिकतेमुळे या क्षेत्राच्या विस्तारात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
४जी आणि ५जी मोबाइल डेटाच्या स्वस्त दरांमुळे देशातील युजर्स केवळ ५ किंवा १० रुपयांचे वाय-फाय व्हाउचर खरेदी करण्यासही तयार नाहीत, असं निरीक्षण ट्रायनं नोंदवलं आहे.
भारतातील मोबाइल डेटाचे दर अत्यंत आक्रमक आहेत. त्यामुळे ग्राहकांची अशी मानसिकता बनली आहे की इंटरनेट ही ‘शून्य’ खर्चात मिळणारी गोष्ट आहे, असं ट्रायनं म्हटलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट लावणारे छोटे उद्योजक जेव्हा नाममात्र शुल्काची मागणी करतात, तेव्हा ग्राहक त्याकडे पाठ फिरवतात. यामुळे हा उद्योग संकटात आहे.