तुमचं यूपीआय पेमेंट अचानक होईल ब्लॉक! 'या' चुका टाळा, अन्यथा ऐनवेळी होईल फजिती
तुम्ही पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करता, पिन टाकता आणि अचानक मेसेज येतो, 'ट्रांजॅक्शन डिक्लाईन्ड'. पुन्हा प्रयत्न करता, तरीही तेच! कोणतीही पूर्वसूचना नाही की स्पष्ट कारण नाही.
सध्या अनेक युजर्सना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. तुमचे यूपीआय पेमेंट अचानक का थांबतं आणि अशा वेळी काय करावं, हे जाणून घेऊ.
यूपीआय व्यवहार जितके सोपे वाटतात, त्यामागे बँकांची सुरक्षा यंत्रणा तितकीच सतर्क असते. तुमच्या व्यवहारांच्या ठरावीक पॅटर्नमध्ये थोडाही बदल झाला, तरी बँक तातडीने सावध होते.
असामान्य रक्कम : जर तुम्ही नेहमी १००-२०० रुपयांचे व्यवहार करत असाल आणि अचानक मोठी रक्कम पाठवू लागलात, तर यंत्रणा त्याला 'रिस्क' समजून ब्लॉक करू शकते.
नवा युजर : एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम पहिल्यांदाच पाठवताना बँका सुरक्षेसाठी व्यवहार थांबवू शकतात.
पेमेंट एकदा फेल झाले की आपण लगेच पुन्हा-पुन्हा प्रयत्न करतो. मात्र, हीच सर्वात मोठी चूक ठरते. असे प्रयत्न बँकिंग सिस्टमला अधिक संशयास्पद वाटतात. यामुळे तुमचे खाते तात्पुरते गोठवले जाऊ शकते.
तांत्रिक बिघाडच नाही, तर चुकीचा पिन वारंवार टाकणं, व्यवहार मर्यादा संपणे वा बँकेच्या सर्व्हरमधील अडथळे यामुळेही पेमेंट अडकू शकतं.
अशा वेळी काय करावं? पेमेंट फेल झाल्यास लगेच प्रयत्न करू नका. किमान २-५ मिनिटं वाट पाहा.
एरर मेसेज काय सांगतोय ते पहा, त्यातच उत्तर असतं. अडचण कायम राहिली, तर सतत प्रयत्न करण्यापेक्षा बँकेला कळवणं केव्हाही चांगलं.