५० पैशांचे नाणे आजही चालते का? RBI स्पष्ट म्हणाली...
अनेकांना विसरायलाच झाले असेल हे नाणे...
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात चलनात असलेल्या विविध मूल्यांच्या नाण्यांच्या वैधतेबद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे.
एकाच मूल्याच्या नाण्यांचे डिझाईन वेगवेगळे असल्याने, अनेक ठिकाणी, विशेषतः ₹10 चे नाणे स्वीकारण्यास व्यापारी आणि सर्वसामान्य लोक नकार देत असल्याच्या तक्रारी आरबीआयला प्राप्त झाल्या होत्या.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ५० पैसे, ₹१, ₹२, ₹५, ₹१० आणि ₹२० या सर्व मूल्यांची नाणी ही वैध चलन आहेत. त्यांचे आकार, थीम किंवा डिझाईन वेगळे असले तरी, ती व्यवहारांसाठी पूर्णपणे स्वीकारार्ह आहेत.
नाण्यांचे आयुष्यमान जास्त असल्यामुळे, भारत सरकार वेळोवेळी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित नवीन डिझाईनची नाणी चलनात आणते. यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या डिझाईनची नाणी बाजारात फिरत असतात.
उदाहरणार्थ, ₹१० चे नाणे आतापर्यंत सुमारे १४ वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये जारी करण्यात आले आहे. यापैकी '₹' (रुपयाचे चिन्ह) असलेले आणि नसलेले दोन्ही प्रकारचे ₹१० चे नाणे वैध आहे.
अल्प माहिती असलेल्या किंवा गैरसमज असलेल्या काही व्यक्तींमुळे नाण्यांच्या खरेपणाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत.
अशा अर्धवट माहितीवर विश्वास न ठेवता, लोकांनी सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये ही नाणी स्वीकारणे सुरू ठेवावे, असे आवाहन आरबीआयने केले आहे.
आरबीआयने सर्व बँकांच्या शाखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी कोणतीही नाणी, विशेषतः ₹१० चे नाणे, स्वीकारण्यास नकार देऊ नये.
जर कोणत्याही बँक शाखेने हे निर्देश पाळले नाहीत किंवा नाणी स्वीकारण्यास नकार दिला, तर त्यावर आरबीआयद्वारे कठोर कारवाई केली जाईल.