क्रेडिट कार्ड वापरताना चुका टाळा, अन्यथा असे अडकाल!
आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे कर्ज आहे हे माहीत असूनही, त्यावरील कॅशबॅक, डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट्समुळे लोक त्याचा वापर करत आहेत.
क्रेडिट कार्डचा योग्य आणि मर्यादित वापर फायदेशीर ठरू शकतो, पण चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता, यातील एक मोठी अडचण म्हणजे कर्जाच्या जाळ्यात अडकणे.
महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढणे मोठी चूक आहे, कारण रोख रक्कम काढल्याच्या पहिल्या दिवसापासूनच व्याज लागते, यामुळे तुमचे पैसे व्याज भरण्यातच जातात.
डिस्काउंट व कॅशबॅकमुळे क्रेडिट कार्डवरुन गरजेपेक्षा जास्त खरेदी होते व खर्च वाढून बजेट बिघडते, बिल भरणे कठीण होते. म्हणूनच, मासिक उत्पन्नाच्या ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च क्रेडिट कार्डने करू नये.
बिल भरण्यास एका दिवसाचाही उशीर करू नये. उशीर केल्यास वेगवेगळे शुल्क लागते. तसेच, किमान पेमेंट भरल्यास उरलेल्या रकमेवर जास्त व्याज लागते. यामुळे तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता.
अनेक लोक एका कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या कार्डचा वापर करतात.
यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो. अनेक कार्ड्स आणि त्यांची बिले सांभाळणेही कठीण होते.