RBI Latest News: तुमच्यासोबत बऱ्याचदा असं होत असेल की, तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाता... तुम्हाला १००, २०० रुपयांची गरज असते; पण एटीएममध्ये ५०० रुपयांच्याच नोटा असतात. मग तुम्हाला ५०० रुपयांचीच नोट काढावी लागते. रिझर्व्ह बँकेने याचसंदर्भात आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तसे निर्देश सर्व बँका आणि एटीएम सेवा पुरवठादार संस्थांना दिले आहेत. एटीएममध्ये १०० रुपये आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवा, असे रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले असून, यामुळे एटीएममध्ये १०० रुपये, २०० रुपये या नोटांचा भरणा करण्याकडे बँकांचे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. आरबीआयने सोमवारी हे निर्देश देताना म्हटले आहे की, सर्वसामान्य माणसांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी असे करणे गरजेचे आहे. त्यासाठी एटीएममधून १०० रुपये, २०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणातून उपलब्ध व्हायला हव्यात.
वाचा >>तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
व्हाईट लेबल एटीएमची संख्या मोठी
रिझर्व्ह बँकेने एक आदेश काढून बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले आहे की, टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी व्हायला हवी. व्हाईट लेबल एटीएम हे सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमप्रमाणेच काम करतात. हे एटीएम बँकांनाऐवजी खासगी वित्तीय अथवा गैर बँकिंग कंपन्या चालवतात. अशा एटीएमची संख्या देशभरात मोठी आहे.
एक कॅसेट १०० रुपये वा २०० रुपयांच्या नोटांची हवी
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण एटीएमपैकी ७५ टक्के एटीएममध्ये एक कॅसेट (नोटा असलेली पेटी) १०० रुपये वा २०० रुपयांच्या नोटांची असायलाच हवी. या एका कॅसेटमध्ये अडीच हजार नोटा असतात. तर एका एटीएममध्ये साधारणतः चार किंवा ६ कॅसेट्स असतात. पुढच्या टप्प्यात ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममध्ये एक कॅसेट १०० रुपये किंवा २०० रुपयांच्या नोटांची हवी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेंने बँकांना दिले आहेत.